मनोविकाराची लक्षणे ओळखणे गरजेचे - डॉ.नितीन पाटील
सांगली / रोहित रोकडे
मानसिक आजारांच्या काही लक्षणांना सर्वांनी ओळखणे खूप गरजेचे बनले आहे. त्याचे सामान्य ज्ञान सर्वांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतः चे व इतरांचे मानसिक आरोग्य तज्ञांच्या मदतीने सुधारता येईल असे मत भारती हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
येथील भारती हॉस्पिटलमध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगच्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, सायकॉलॉजिस्ट दशरथ सावंत प्रमुख उपस्थित होते.यानिमित्त पोस्टर प्रदर्शन, प्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली.
मानसिक कल्याणास प्राधान्य देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. एच.एम.कदम यांनी सांगितले.
डॉ.नितीन पाटील म्हणाले,
लहान मुलांपासून सर्व वयोगटातील व्यक्ती मानसिक आजारग्रस्त होऊ शकतात. त्यांचे वागणे सामान्य वाटत नसेल किंवा बदलले असेल तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन योग्य ते निदान व उपचार केल्यास भविष्यातील आत्महत्येसारखे गंभीर प्रकार रोखता येतात. या व्यक्तींना समाधानी आयुष्य जगण्यास मदत होते.
नैराश्य, निद्रानाश, विस्मरण, संशय, भास किंवा भ्रम होणे, व्यसने, लैंगिक समस्या, डोकेदुखी, शिकण्यातील समस्या यासोबत मोबाईल व इंटरनेटचे व्यसन प्रत्येकाला जडले आहे. त्यामुळे अनेक गंभीर मानसिक, शारीरिक व इतर समस्या निर्माण होतात. या आजारांसह अनेक इतर मानसिक आजार मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारांनी बरे होऊ शकतात.
वेळेत लक्षणे ओळखून कोणतीही लाज न बाळगता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
सायकॉलॉजिस्ट दशरथ सावंत म्हणाले, शारीरिक स्वास्थ्यांबद्दल आपण जसं जागरूक असतो तसं मानसिक आरोग्याबद्दलही पाहिजे. मानसिक गोष्टींवरच समाजाने फोकस केला पाहिजे. करणी, भुतबाधा झाली असल्याचे समजून अगोदर अघोरी उपचार करण्यात येत होते. मात्र आता आधुनिक उपचारांची सोय झाली आहे. तृतीय वर्षाच्या मुलांनी एक नाटिका सादर केली. त्यातून सकारात्मक मानसिकता कशी असावी याची जनजागृतीही झाली.
एका मानसिक आजार झालेल्या पोटच्या पोराला मांत्रिकाकडे न घेवून जाता नागरिकांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन त्यास उपचार करण्याचा सल्ला नाटिकेतून देण्यात आला. त्यातून उपायही सांगितले. सकारात्मक विचार करून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याने आत्मविश्वास व मनोधैर्य वाढते.
पोस्टर प्रदर्शनातून मानसिक आजार टाळण्यासाठी कोणते मार्ग आहेत, सकारात्मक मानसिकता कशी ठेवायची, दैनंदिन जीवनात तणावमुक्त होण्याचे उपाय यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ले यांची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांनी रुग्ण व नातेवाईकांना पटवून दिली.
नर्सिंग कॉलेजचा स्टाफ, डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
मिल्का देवराज यांनी सुत्रसंचालन केले. मानसिक आरोग्य परिचर्याचे विभागप्रमुख प्रा.डॉ.बाहुबली जे.जी., क्लिनिकल इंन्स्ट्रक्टर ए.एस. बेरगेरी, सॅमसन कांबळे यांनी आयोजन केले.
दरम्यान सांगलीवाडी येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातही द्वितीय वर्ष पी.बी. बी.एस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी घोषवाक्य स्पर्धाही घेण्यात आल्या. प्रा.नारायण घोरपडे, प्रा.राजेश गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.