भारती हॉस्पिटलमध्ये सहा वर्षाच्या बाळाला जीवदान | दुर्मिळ आजाराची डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
सांगली - रोहित रोकडे
...त्या मुलाचं वय वर्ष अवघं ६. नाव अथर्व राजेंद्र यमगर रा. रांजणी ता.कवठेमहांकाळ. खेळण्याचं, बागडण्याचं हे वय. पण त्याला सारखी धाप लागायची. दोन- तीन महिन्यांपासून तो धापेमुळे त्रस्त होता. आई-वडिलांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. बाहेर बऱ्याच ठिकाणी दाखवलं. उपचार घेऊन सुद्धा तब्येतीत फरक पडत नव्हता. मुलाचे वडील राजेंद्र यमगर दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून जातात.
मग त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मशिनरी असल्याने तेथे जाण्यास सुचवले...अखेर त्या सहा वर्षाच्या मुलावर भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ, युनिट इन्चार्ज व डीन प्रा. डॉ.सारा धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक टीम गतिमान झाली. अन् उपचार चालू केले.
अथर्वची इकोकार्डिओग्राफीची तपासणी केली असता त्याला पेरिकार्डिअल इफ्युजन म्हणजेच हृदयाभोवती पाणी जमा झालेले आढळले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ.रियाज मुजावर यांनी हे पाणी काढण्यासाठी त्याजागी एक कॅथेटर बसविला. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तमिश्रित पाणी २-३ आठवडे येत होते. त्यामुळे डीन डॉ.सारा धनवडे, हृदयशल्यचिकित्सक डॉ. रणजित जाधव, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.रियाज मुजावर, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीस्ट डॉ.अभिनव मोहन यांच्या संयुक्त पथकाने सबटोटल पेरिकार्डिएक्टोमी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ.रणजित जाधव यांनी शस्त्रक्रिया केली. ती यशस्वी झाली. बाळाला कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रावर ठेवले. त्याला अँटिबायोटिक इंजेक्शन चालू केले. मुलगा हळू हळू ठीक होत होता. बायोप्सी रिपोर्टमध्ये लिंफॅनाजिओहिमॅनजिओमॅटोसीसचे निदान झाले.
अथर्वला झालेला हा एक दुर्मिळ आजार होता. डीन डॉ.सारा धनवडे यांनी त्याच्यावर योग्य उपचार केले. अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व स्टाफ यांच्या कुशल हाताळणीमुळेच हे शक्य झाले. कारण या आजाराचे निदान व उपचार एक आव्हान होते. अथर्वचे पालक अतिशय गरीब आहेत. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि आ. डॉ.विश्वजित कदम यांच्या सहकार्याने संपूर्ण उपचार अत्यंत कमी खर्चात झाले.
- डॉ.एच.एम.कदम | भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक
...तरीपण मुलाला श्वासाची धाप चालूच होती. छातीची सोनोग्राफी केली. त्यात पाणी झाल्याचे निदान झाले. पेट सिटी स्कॅन मध्ये लिफॅनजाटिक मालफॉर्मेशनचे निदान झाले. श्वासाची धाप वाढत गेल्याने छातीतून पाणी काढले. बाळाची परिस्थिती बिघडल्याने त्याला परत कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. हळूहळू धाप कमी झाली. पण छातीत वारंवार पाणी भरत असल्याने सतत पाणी काढण्यात येत होते. हळूहळू धाप कमी झाली. व छातीतील पाण्याचे प्रमाणही कमी झाले.
माझ्या मुलाला व्यवस्थित उपचार मिळाले. त्यामुळे तो या आजारातून बरा झाला. भारती हॉस्पिटलमधील डॉक्टरांची सेवा तत्पर असल्यानेच हे शक्य झाले. आ.डॉ.विश्वजित कदम यांनीही मोलाचं सहकार्य केले. त्यांच्यासह डॉक्टरांचे व हॉस्पिटल प्रशासनाचे आभार.
-राजेंद्र यमगर, रांजणी
बाळाला या दरम्यान १०-१२ वेळा रक्त व प्लेटलेट्स देण्यात आले. त्यादरम्यान त्याला न्युमोनिया झाल्यामुळे उच्च अँटिबायोटिक्स सुरू केली. हळूहळू न्युमोनियाचे प्रमाण कमी होवून धापही कमी झाली. आता नैसर्गिकरीत्या ते सहा वर्षाचे मूल श्वास घेवू लागले. परंतू त्या मुलाची तब्येत ठीक होण्यासाठी तब्बल तीन महिने उपचार चालू होते.
यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, रेडिओलॉजीचे डॉ.निकीत मेहता, डॉ. हरिष व फिजीओथेरपीचे डॉ.सचिन शेट्टी यांचेही सहकार्य लाभले.