BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये २३ वर्षाच्या युवकावर देशातील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी - डॉ. एच. एम. कदम


भारती हॉस्पिटलमध्ये २३ वर्षाच्या युवकावर देशातील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी - डॉ. एच. एम. कदम

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती हॉस्पिटलमध्ये एका अपघातग्रस्त २३ वर्षीय युवकावर अवघड शस्त्रक्रिया करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. 'राईट कॉमन कॅरोटीड टू राईट प्रॉक्सिमल ब्रॅकीयल आर्टरी बायपास ग्राफ्टींग विथ आरएसव्हीजी' ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

भारती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. आवश्यक साधनसामुग्री आहे त्यामुळे हे शक्य होत असल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले. 

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजित जाधव उपस्थित होते. भारतातील दुर्मिळ केस हाताळल्याबद्दल डॉ.एच.एम.कदम यांनी डॉ.रणजित जाधव व सहकारी यांचे अभिनंदन केले.

डॉ.अजित जोशी म्हणाले, अशा प्रकारच्या दुर्मिळ शस्त्रक्रियेची आतापर्यंत भारतात इतर कोणत्याही सेंटरकडून नोंद झालेली नाही.

सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजित जाधव म्हणाले, देशात प्रथमच सांगली जिल्ह्यातील भारती हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. अत्यावश्यक सेवा विभागात हे पहिल्यांदाच झाले आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

डॉ.रणजित जाधव म्हणाले, २३ वर्षीय युवकाचा मोटरसायकल वरुन जात असताना अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जावून तो आदळला. उजव्या हाताला जोराचा मार लागला. सिव्हिलला नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी भारती हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णाला तातडीने अत्यावश्यक सेवेत दाखल केले.

सीव्हीटीएस सर्जन डॉ.रणजित जाधव यांनी रुग्णाला बघितले. त्याच्या उजव्या हाताच्या रक्तवाहिन्या दबल्या होत्या. हाड तुटले होते. हाताचा रक्तपुरवठा छातीतील रक्तवाहिनीपासून संपूर्ण बंद होता. रुग्णाचा उजवा हात थंड पडला असून हाताची नाडीही लागत नव्हती. हाताच्या संवेदना हरवल्या होत्या. ऑक्सिजनचे प्रमाण ८० टक्के होते. 

अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.सुनील पाटील यांनी रूग्ण बघुन ब्रॅकेल फ्लेक्सेस इंज्युरीसुद्धा असण्याची शक्यता वर्तवली. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अभिनव मोहन यांनी रुग्णाच्या हाताची सोनोग्राफी केली. त्यांनी निदान केले. राईट डिस्टल सबक्लॅव्हियन, राईट प्रॉक्सीमल ॲक्सिलरी आर्टरी इंज्युरी आहे असे सांगितले. पुन्हा खातरजमा करण्यासाठी सीटी एन्जिओ केला. रुग्णाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी घेतले. प्रथमतः तुटलेल्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रक्तवाहिन्या जोडून रक्तप्रवाह सुरळीत केला. पायाची रक्तवाहिनी काढून तिची एक बाजू मेंदूकडे जाणाऱ्या उजव्या रक्तवाहिनेला जोडली. आणि दुसरी बाजू उजव्या हाताच्या रक्तवाहिनीला जोडून बायपास शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

शस्त्रक्रियेनंतर हाताचा रक्तप्रवाह सुरू झाला. हाताची नाडी चालू झाली. हाताचे ऑक्सिजनचे प्रमाण ९८ टक्के झाले. 

ही शस्त्रक्रिया डॉ.रणजित जाधव, डॉ.भूपेंद्र यांनी केली. डॉ. सुनिता घोष, डॉ.नवीन, डॉ.ध्रु, डॉ.जामीन, डॉ.आशिष, डॉ.तेजस यांचे सहकार्य लाभले.