BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलातर्फे रयत शिक्षण संस्थेवर निवडीबद्दल महेंद्र आप्पा लाड व जे.के.बापू जाधव यांचा सत्कार


भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलातर्फे रयत शिक्षण संस्थेवर निवडीबद्दल महेंद्र आप्पा लाड व जे.के.बापू जाधव यांचा सत्कार   

भारती हॉस्पिटल न्यूज l  सांगली / रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी महेंद्र अप्पा लाड तसेच जे.के.बापू जाधव यांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. याचे आयोजन भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील सर्व शाखांनी केले होते. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी निवड झालेल्या दोघांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. 

सत्काराला उत्तर देताना सांगली जिल्हा बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड म्हणाले, आ. डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून हे पद मला मिळाले आहे. याचा आनंद आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर सामाजिक आणि राजकीय जीवनात काम केले. ते करत असताना जनतेसाठी कसे काम करावे ही शिकवण साहेबांनी मला घालून दिली. तो आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी काम करणार आहे. 

डॉ.कदम साहेब, शरद पवार व एन.डी.पाटील तिघे सोबत असताना त्यांची वैचारिक बैठक मी जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे आशिया खंडात सर्वात मोठी असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत डॉ.पतंगराव कदम साहेबांचं एक वजन होतं हे मला ठळकपणे दिसून आले. रयत शिक्षण संस्थेत ज्ञानदानाचे काम चांगले होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे शिक्षणाची गंगा ही बहुजनांच्या दारापर्यंत आणि गोरगरीब, सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत जावून पोहचली.

 इथून पुढे स्व. डॉ.पतंगराव कदम यांचा आदर्श घेऊन आणि आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून वाडीवस्ती तसेच खेडोपाड्यात अजून काही सुधारणा करता येतात का ते पाहणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शिक्षण आणि शिक्षक यांचे महत्त्व सांगितले. संधी आली की सर्व काही साध्य होत असल्याचे स्पष्ट केले. कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे नुतन सदस्य जे.के.बापू जाधव म्हणाले, भारती विद्यापीठ म्हणजे आपलंच आहे. आणि घरच्या लोकांनी केलेला या सत्काराबद्दल सदैव ऋणी राहीन. स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या मनात आले की ते कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करत होते. तोच वसा आणि वारसा त्यांचे सुपुत्र आ.डॉ.विश्वजीत कदम नेटाने चालवत आहेत. रयत शिक्षण संस्थेत त्यांचे जातीने लक्ष आहे. त्यांच्या प्रयत्नातून मला हे पद मिळाल्याचे जाहीर केले. घरच्या माणसांनी पाठीवर थाप मारली की, ती आयुष्यभर मोलाची ठरते. 

डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे, पल्लवी जामसांडेकर, डॉ.निलिमा भोरे, डॉ.स्नेहा कटके यांच्यासह भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलातील सर्व प्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक, नर्सिंग स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सूत्रसंचालन सूर्यकांत बुरूंग, स्वागत व प्रास्ताविक डॉ. डी.जी. कणसे यांनी केले. आभार सरस्वती हेरवाडे यांनी मानले.