BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

नर्सिंग कॉलेजची मुले नक्कीच यशस्वी होतील - कुलगुरू डॉ.विवेक सावजी


नर्सिंग कॉलेजची मुले नक्कीच यशस्वी होतील - कुलगुरू डॉ.विवेक सावजी

 सांगली - दि. ०६/०५/२०२३  / रोहित रोकडे

भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांनी कोणतीही आर्थिक परिस्थिती नसताना भारती विद्यापीठ नावाचे एवढे मोठे विश्व उभा केले आहे. आज इथे प्रत्येक क्षेत्रात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ते आज यशोशिखरावर पोहोचले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की नर्सिंग कॉलेजला आज नव्याने दाखल झालेली मुलं मुली नक्कीच यशस्वी होतील असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांनी केले.


येथील भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे यांनी केले होते.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, डॉ. आर. बी. कुलकर्णी, डीन डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. नितीन नायक, फिजीओथेरपी प्राचार्या डॉ. स्नेहा कटके, डेंटल प्राचार्य डॉ.शरद कामत, प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठ गीताने झाली. नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेला मी प्रथम प्राधान्य देईन. नैतिकता पाळेन. रुग्णांची चांगली सेवा करेन. तत्परता दाखवेन अशी शपथ घेतली. त्याचे वाचन डॉ.निलिमा भोरे यांनी केले. २०२२-२३ चा अहवाल डॉ. निलिमा भोरे यांनी वाचून दाखवला. त्यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी यांची अत्युच्च कामगिरीची माहिती देवन निकालाची परंपरा शंभर टक्के असल्याचे सांगितले. 

कुलगुरू डॉ.विवेक सावजी म्हणाले, प्रथमतः मी सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत करतो की तुम्ही सर्वांनी भारती विद्यापीठात प्रवेश घेतला. स्व. डॉ.पतंगराव कदम साहेबांनी १९६४ साली स्थापन केलेले विद्यापीठ आज देशात नामांकित तर आहेच. शिवाय जगातही नावाजलेले आहे. भारती विद्यापीठ म्हणजे सरस्वतीचं मंदिर आहे. येथे प्रवेश घेतल्याने तुमचा वैद्यकीय क्षेत्रातील सराव चांगला होतो. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. आभाळाची उंची असणारे स्व. डॉ.कदम साहेब ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक संधी उपलब्ध करून दिल्या.  

विद्यार्थ्यांना ते म्हणाले की, तुमच्याकडून रुग्णांना बऱ्याच अपेक्षा असतात. त्यावेळी तुम्ही त्यांना एक विश्वास, आत्मविश्वास दिला पाहिजे. पालकांची अपेक्षापूर्ती करा असा मोलाचा सल्लाही दिला. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि आ.डॉ. विश्वजित कदम, भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप यांचेही कौतुक केले. 

सुत्रसंचालन प्रा. सिंधू गायकवाड, स्वागत डॉ.जे.जी. बाहुबली तर आभार निकिता भंडारी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक, प्राध्यापक, डॉक्टर उपस्थित होते.