आधुनिकता साधनात नाही तर ती विचारात हवी - संजय आवटे
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
आजकाल सर्वत्र सोशल मीडियाचे वारे जोरात घुमत आहे. सारा बोलबोला त्याचाच आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा मालक एकच असल्याने निर्णय तरुणांनो तुमचा असला पाहिजे. सोशल मीडियाचा अजिबात आधार घेवू नका, त्याचा आज सर्व खेळ चालू आहे. सध्याचे युग हे आधुनिक आहे हे खरं आहे. परंतू आधुनिकता साधनात नाही तर ती विचारात हवी असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी केले.
विष्णुदास भावे नाट्यगृहात डॉ.पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमात 'तरुणाईचा भारत' या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम होते. प्राचार्य डॉ.डी.जी. कणसे, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. निलिमा भोरे, डॉ. पल्लवी जमसांडेकर, उपअधिष्ठाता डॉ. आर.पी. लिमये प्रमुख उपस्थित होते.
आवटे म्हणाले, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमचा मुद्दा व्यवस्थित मांडता आला पाहिजे. तरुणांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत. आज 'लष्कर ए तोयबा'पेक्षा 'लष्कर ए होयबा'ची जास्त भीती वाटते. तरुणांच्या डोळ्यात स्वप्ने असतात. ती नेहमी जिवंत राहिली पाहिजेत. सतत नवनवीन स्वप्ने बघून त्यांचा पाठलाग केला पाहिजे. आज देशात तरुण भरपूर असल्याचा आनंदच आहे. एखादी घडलेली घटना एकच असते परंतू आपण त्याकडे कसं बघतो यावर ते अवलंबून असते हे सांगताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांची उदाहरणे दिले. तरुणांनी बदलणारे जग समजून घेतले पाहिजे. जीवनात आलेल्या आव्हानांवर मात करायची असे आवाहनही त्यांनी उपस्थित तरुणाईला केले.
ते पुढे म्हणाले, परिवर्तनाची व बदलाची लढाई कायम लढत रहायची असते. प्रत्येकाने जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूस बनलं पाहिजे, ते माणूसपण जपलंही पाहिजे. महापुरुषांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, एका जातीधर्मात त्यांना अडकवून ठेवू नका. हे सांगत असताना त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सविस्तरपणे सर्वांसमोर मांडला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत होते हे महात्मा फुलेंनी महाराष्ट्राला सांगितले. महापुरुषांचा वारसा घेऊनच तरुणांनी पुढे गेले पाहिजे असा संदेश दिला.
माध्यमांविषयी बोलताना ते म्हणाले, तरुणांना माध्यम्यांचा वापर प्रभावी करता आला पाहिजे. यामुळे आपणास विचार करता येत नाही परिणामी विचार करायला शिकावे लागते. तरुणांनी जास्त विचार करू नये ही आजची व्यवस्था आहे. वेगळ्या विचारांची व्यवस्थेला भीती वाटते. म्हणून पानसरे, दाभोळकर यांसारखे खून होतात. म्हणून आपणास भारताची गाथा समजली पाहिजे. या देशात ७० टक्के तरुण आहेत. एवढे वैविध्य जगात कुठेही नाही. भारत नव्या पिढीला कळणे फार महत्त्वाचे आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन तरुणांनी विचार केला पाहिजे. काही वैशिष्ट्ये आपणापर्यंत पोचू नये म्हणून व्यवस्था काम करते. इतिहास समजू नये म्हणून काही प्रयत्न सुरू आहेत. सत्तेला, व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे तरुणांचे प्रमुख काम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्याशी माझे जिवाभावाचे संबंध होते. खेड्यापाड्यातील मुले केवळ त्यांच्यामुळे शिकली. 'गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन' या ब्रीदवाक्याखाली या भारती विद्यापीठाची यशस्वी घोडदौड चालू आहे. त्याचा कार्यभार आज आ.डॉ.विश्वजीत कदम नेटाने पुढे चालवत असल्याचे सांगितले.
उद्याचा भारत तरूणांच्या हातात...
सर्वधर्मसमभाव जपणारा हा भारत देश आहे. तरुणांना
हवे ते करता आले पाहिजे. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यात करता आले पाहिजे. संधी मिळाली पाहिजे. ज्येष्ठांनी तरुणांची भाषा अवगत केली पाहिजे. नवीन पिढी, त्यांची माध्यमे लक्षात घेतली पाहिजेत त्यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे.
उद्याचा भारत तरुणांवर अवलंबून आहे. शेवटी चांगला माणूस बना. आनंदाने जगा. आनंदाने जगणे फार महत्वाचे आहे. मुलामुलींना त्यांच्या स्वातंत्र्यानुसार जगू द्या. कारण उद्याचा भारत तरुणांच्याच हातात आहे.
सूत्रसंचालन प्रा.सुर्यकांत बुरुंग, स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे तर आभार प्राचार्या डॉ.निलिमा भोरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.