भारती हॉस्पिटलमध्ये हृदयाचा गंभीर आजार झालेल्या रुग्णावर यशस्वी उपचार l डॉक्टरांची उत्तम कामगिरी
भारती हॉस्पिटल न्यूज सांगली/ (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये एका ६२ वर्षीय रुग्णावर डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण सध्या बरा आहे. सीव्हीटीएस विभागाने आजपर्यंत बरेच असे दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. यासारख्या शस्त्रक्रियेला डीन डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांचे नेहमीच सहकार्य असते.
सीव्हीटीएस विभाग प्रमुख डॉ. रणजितसिंह जाधव, सीव्हीटीएस सर्जन डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी साधारण चार ते पाच तास हे हृदयाचे ऑपरेशन केले.
डॉ.जाधव म्हणाले, रुग्णाला दोन वर्षे छातीत दुखत होते. त्यांची दोनदा अँजिओप्लास्टी करण्यात आली. तरीसुद्धा सतत स्टेंनट ब्लॉक झाल्यामुळे त्यांच्यात फरक पडत नव्हता. रुग्णाच्या छातीत सतत कळ मारत होती व हृदयाचे काम खालावले होते परिणामी कधीपण हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती. हृदयाची पंपिंग कपॅसिटी खालवल्याने हृदय २५-३० टक्के पंपिंग करत होते. रुग्णाच्या हृदयाची अवस्था गंभीर होत चालली होती. साखरेचे प्रमाणही वाढले होते. ताबडतोब ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झाली. सतत छातीत दुखत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भारती हॉस्पिटलच्या सीव्हीटीएस विभागाने तातडीने दखल घेवून रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. रुग्णाला प्राथमिक औषधोपचार करून हृदयाचे बायपास ऑपरेशन पार पडले. पाच ठिकाणी बायपास ग्राफ्ट वापरण्यात आले.
डॉ.पृथ्वीराज पाटील म्हणाले, शस्त्रक्रियेनंतर रुग्णामध्ये तात्काळ फरक पडला. हार्ट पंपिंग ४५ टक्केच्या वर आले. यापुढे रूग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने सांगितलेला आहार, योग्य व्यायाम तसेच साखरेवर योग्य नियंत्रण ठेवल्यास त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभेल.
आशिष डेव्हिड, तेजस केदार, मिनल घाटगे व सर्व टीमचे यासाठी सहकार्य लाभले.