भारती हॉस्पिटलमध्ये समाज सुधारण्याची चांगली परंपरा - पोलीस प्रमुख संदीप घुगे
देहदान करणाऱ्या नातेवाईकांचा सन्मान
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये समाज सुधारण्याची चांगली परंपरा असल्याचे मत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी व्यक्त केले.
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये २०१७ पासून ते आजपर्यंत एकूण ३४ जणांनी देहदान केले. त्या नातेवाईकांचे ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ. सारा धनवडे, नर्सिंग प्राचार्या डॉ. निलीमा भोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन मुदीराज यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, सपोनि संदीप शिंदे व डॉक्टर उपस्थित होते.
पोलीस प्रमुख घुगे म्हणाले, भारती विद्यापीठमध्ये ज्यांनी देहदान केले आहे अशा नातेवाईकांचे ऋण व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. 'मरावे परी अवयवदानरूपी उरावे' हा संदेश सर्वत्र पोहचला पाहिजे. समाजातील काही अनिष्ट रूढींना नक्कीच फाटा दिला पाहिजे. दरवर्षी सुमारे ५०० हून अधिक रस्ते अपघात होतात. त्यामध्ये काही जखमी होतात. काहींचे अवयव निकामी होतात. त्यांच्यासाठी खरंतर जे अवयवदान व देहदान करतात त्यांचा नक्की उपयोग होतो. भारती हॉस्पिटलने ही देहदान जनजागृती समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवावी.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी म्हणाले, सरकारने ३ ऑगस्ट तारीख जाहीर करून हा देहदान दिवस साजरा करायला सांगितले आहे. देहदान करण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते हे स्पष्ट केले. नातेवाईकांनीही मनोगत व्यक्त केले.
भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी नेहमीच भारती हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांना बळ दिल्याचे डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले.
शिक्षक असल्याने मृत्यूपश्चातसुद्धा त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग झाला पाहिजे हा हेतू ठेवून एका ८० वर्षीय आजोबांनी देहदान केल्याची आठवण एका नातेवाईकांनी सांगितली. कुणाची आई, वडील, आजोबा, आजी यांनी देहदान केले होते. त्यांचे सर्व नातेवाईक जड अंतःकरणाने सन्मान स्विकारण्यासाठी पुढे जात होते.
डॉ.नितीन मुदीराज म्हणाले, देहदान करण्यासाठी कोणतीही वयाची अट नाही. कोणतेही गैरसमज मनात बाळगू नका. देहदान केलेल्यांचा उपयोग हा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी होतो. येथे ट्रान्सप्लांट प्रोग्रॅम चालू असतो. ५ रिनल ट्रान्सप्लांट यशस्वी केले आहेत. त्याबद्दल डॉ.रणजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याचसोबत डॉ. बिपिन मुंजाप्पा, डॉ.ज्योत्स्ना परांजपे, डॉ. चिदानंद चिवटे, डॉ. दीप्ती कुलकर्णी, ऑर्थोचे डॉ. सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण तांदळे, प्रदीप कांबळे, पिंटू मेत्री, गणेश यादव, डॉ.नितीन मुदीराज, विजय जाधव, डॉ.सुनील कदम यांना पोलीसप्रमुख घुगे यांच्याहस्ते गौरवण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ.शिल्पा गायकवाड तर आभार डॉ.नितीन मुदीराज यांनी मानले.