भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा संपन्न | मृत्यूपश्चात जनतेने नेत्रदान करावे- डॉ. संजय साळुंखे
सांगली | ११/०९/२०२१
नेत्रदान आणि अवयवदान याचे महत्व आज समाजात अनन्यसाधारण आहे. आपले डोळे कुणाची तरी दृष्टी बनू शकतात. त्यामुळे मृत्यूपश्चात जनतेने नेत्रदान करण्याचे आवाहन जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले. कोविड काळात भारती हॉस्पिटलने केलेल्या कामगिरीबद्दलही त्यांनी कौतुक केले.
नेत्रदानाविषयी विविध उपक्रमाने जागरूकता निर्माण करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. भारती विद्यापीठ नेत्रविभागातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी ४ सप्टेंबर रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. एमबीबीएस व ऑप्टोमेट्रीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदानाविषयी विविध प्रकारच्या पोस्टरचे प्रदर्शन भरविले आहे. दरम्यान नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व्याख्याने तसेच नेत्रदान केलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. ही माहिती डॉ. अजित जोशी यांनी दिली.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम होते. जिल्ह्याचे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. संजय पाटील, अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, नेत्र विभाग प्रमुख व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. शहाजी देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा व आपल्या वैद्यकीय ज्ञानात भर टाकावी. डॉ. हळ्ळींगळे यांनी नेत्रदानाच्या नातेवाईकांचे प्रतिनिधी म्हणून मत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अजित जोशी तर आभार डॉ. राजेश गोटेकर यांनी मानले.
डेप्युटी डीन डॉ. पी.ई.जगताप, डॉ. जी.बी.धुमाळे, डॉ. सुनिल पाटील, सर्व विभागप्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.