BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलची रुग्णसेवा उत्तम - डॉ.संजय साळुंखे | नेत्रदान पंधरवड्याचे केले उद्घाटन

भारती हॉस्पिटलची रुग्णसेवा उत्तम - डॉ.संजय साळुंखे | नेत्रदान पंधरवड्याचे केले उद्घाटन


सांगली-

भारती विद्यापीठ प्रथमपासूनच सामाजिक बांधिलकी जपत आले आहे. कोविडमध्ये त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक आहे. जिल्हा प्रशासनाला त्यांनी चांगली साथ आणि सहकार्य केल्याने त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले. या सर्व गोष्टींमुळे भारती हॉस्पिटलची रुग्णसेवा उत्तम असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये ३७ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम होते. डीन डॉ.शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सारा धनवडे, उपवैद्यकीय अधीक्षक व नेत्रविभाग प्रमुख  डॉ.अजित जोशी प्रमुख उपस्थित होते.

ऑप्टोमेट्री विभागप्रमुख डॉ.अजित लिमये, विद्या श्रीराम यांनी नेत्रदान करण्यासंदर्भात एक नाटिका बसवली होती. विद्यार्थ्यांनी त्यातून जनजागृती करुन नेत्रदान करणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले.

डॉ.संजय साळुंखे यांनी मुलांनी सादर केलेल्या नाटिकेसह पोस्टर प्रदर्शनचे कौतुक केले.ते म्हणाले, ही पोस्टर्स तयार करण्यासाठी मुलांनी फार कष्ट घेतले आहेत. तसा वेळही दिला आहे त्यामुळेच ही सुंदर पोस्टर्स आणि त्यातील माहिती उपयुक्त झाली आहे.

डोळ्यांची गरज कोणाला, डोळे का दान करावे, डोळे कोण दान करू शकते, नेत्रदान कसे करावे, नेत्रदानाचे महत्त्व आणि त्याची प्रक्रिया याची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांनी पोस्टरमधून दिली होती.ज्यांनी नेत्रदान केले आहे त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांचा सन्मान करण्यात आला.

डीन डॉ.शहाजी देशमुख यांनी नेत्रदात्या नातेवाईकांचे आभार मानले.त्यांच्या एका निर्णयामुळे मृत नातेवाईकाची आठवण राहते. त्यामुळे दुसर्याच्या जीवनात उजेड पडतो असे सांगितले.

उपवैद्यकीय अधीक्षक व नेत्रविभाग प्रमुख डॉ.अजित जोशी म्हणाले,भारती हॉस्पिटलमध्ये डोळ्यांची बँक आहे. या वर्षीच्या घोषवाक्यानुसार अंध व्यक्तीला बसवले गेलेले डोळे जगणार असून त्या व्यक्तीला सुद्धा दिसणार आहे. यातून सामाजिक संदेश देण्यात आला. नेत्रदान चळवळीची गरज असल्याचे सांगितले. बुबूळाच्या आजारामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांना नेत्रदान करणाऱ्या लोकांची खूप आवश्यकता आहे.

डॉ.ऐश्वर्या पांढरेकर यांनीही नेत्रदानाचे महत्त्व सांगत बुबूळाविषयी माहिती दिली.सूत्रसंचालन डॉ.श्रीलक्ष्मी यांनी तर आभार प्रा. डॉ. राजेश गोटेकर यांनी मानले.'तुमचे डोळे जगू द्या.' ही  आजच्या कार्यक्रमाची टॅगलाईन होती.कार्यक्रमाला डॉक्टर, प्राध्यापक, ऑप्थॉलमॉलॉजी, ऑप्टोमेट्री सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.ऑप्थॉलमॉलॉजी विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते.