BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

नेत्रदान केल्यास अनेकांना जग पाहण्याची संधी - डॉ. विक्रमसिंह कदम l भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा



नेत्रदान केल्यास अनेकांना जग पाहण्याची संधी - डॉ. विक्रमसिंह कदम l भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा l नेत्रदान केलेल्यांच्या नातेवाईकांचा सन्मान 

भारती हॉस्पिटल न्यूज सांगली / रोहित रोकडे 

नेत्रदान केल्यास अनेकांना जग पाहण्याची संधी मिळेल. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करावे, त्याची जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. नेत्रविभागाच्यावतीने यांचे आयोजन केले होते. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम, डीन डॉ. सारा धनवडे, विभागप्रमुख डॉ. राजेश गोटेकर यांच्यासह नेत्रदान केलेल्यांचे नातेवाईक प्रमुख उपस्थित होते.

डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, नेत्रदान चळवळ आता जोर धरत आहे. अजून प्रबोधन होणे गरजेचे आहे. कुणाच्या तरी दातृत्वाने अंधांना दृष्टी मिळते याहून भाग्याची गोष्ट कुठली असू शकत नाही. यासाठी शासनाकडून किती अनुदान येते ते महत्त्वाचे नसून नेत्रदान करणे महत्त्वाचे आहे. नेत्रदान चळवळ वाढवूया. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम याअंतर्गत निश्चित मदत करू अशी ग्वाही दिली. भारती विद्यापीठातच माझे शिक्षण झाले असून त्याचा मला अभिमान आहे. असे सांगत त्यांनी भारती विद्यापीठाचे संस्थापक स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळेच माझ्यासारखी पिढी या जगात सक्षमपणे उभी राहिल्याचे स्पष्ट केले.

डीन डॉ. सारा धनवडे म्हणाल्या, नेत्रदान चळवळीबरोबरच अवयवदान करण्यासाठी समाजातील व्यक्तींनी पुढे आले पाहिजे.

डॉ. राजेश गोटेकर यांनी भारताचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. नेत्र उपचाराच्या बहुतांश सुविधा येथे उपलब्ध असल्याचे सांगून 'मरावे परी नेत्र रुपी उरावे' असा संदेश दिला.

डॉ. अस्मिता मोरे यांनी नेत्रदान पंधरवडा याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून नेत्रदानाचे अधिक महत्त्व विशद केले.  ओप्टोमेट्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यासाठी एक नाटुकले सादर केले. त्याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 

 सूत्रसंचालन डॉ. कौस्तुभ पाटील तर आभार डॉ. शलाका क्षीरसागर यांनी मानले.

ओप्टोमेट्री विभाग प्रमख डॉ. अजित लिमये, डॉ. पंकज पलंगे, डॉ. शिल्पा गायकवाड यांच्यासह डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.