भूलतज्ञांमुळेच वेदनारहित उपचार शक्य - डॉ.एच.एम.कदम
भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक भूलशास्त्र दिवस संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली - रोहित रोकडे
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये जागतिक भूलशास्त्र दिवस संपन्न झाला. भूलशास्त्र विभागातर्फे याचे आयोजन करण्यात आले. डीन डॉ.सारा धनवडे, विभागप्रमुख डॉ.ज्योत्सना परांजपे व सहकाऱ्यांनी धन्वंतरी व भूलशास्त्राचे उद्गाते डॉ.मार्टिन यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
भुलतज्ञ शस्त्रक्रिया संपेपर्यंत रुग्णासोबत असतात. खऱ्या अर्थाने ते पडद्यामागचे कलाकार आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढली आहे. या भूलतज्ञांमुळेच वेदनारहित उपचार रुग्णांवर करता येत असल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले.
डॉ.ज्योत्सना परांजपे यांनी भारती हॉस्पिटलच्या प्रगतीत भुलशास्त्रविभागाचे योगदान असल्याचे सांगितले. डॉ.वसुधा जाधव यांनी पेन क्लिनिक बाबत माहिती दिली. डीन डॉ.सारा धनवडे म्हणाल्या, भूलतज्ञ केवळ ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत नसून तात्काळ सेवा पुरवणे, स्किल लॅब, रोबोटिक अनेस्थेशिया, अवयव प्रत्यारोपणासाठीची तयारी व भूल याचे कार्य ते जोमाने करतात. डॉ.शिल्पा गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर केली. डॉक्टरांची टीम भूल कशी देते याचे प्रात्यक्षिक दाखवणारी ध्वनीफीतही दाखवण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सूत्रसंचालन दीलू पिलाई तर आभार डॉ.झामीन भट यांनी मानले.डेप्युटी डीन डॉ.नितीन मुदीराज, प्रमुख, शिल्पा गायकवाड, डॉ.अशोक देशपांडे, डॉ.तृप्ती देशपांडे, डॉ.सुनंदा बणगर, डॉ.वर्षा देशपांडे, डॉ.प्रणिता काटे, डॉ.भाग्यश्री पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.