खटाव येथील आप्पासो चौगुले यांचे भारती हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर देहदान
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
खटाव ता. पलूस येथील आप्पासो केशव चौगुले (वय-७७) यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान व नेत्रदान येथील भारती हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केले.
डीन डॉ. नितीन मुदीराज म्हणाले, देहदान केल्याचा फायदा वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार आहे. मरावे परी अवयवरुपी उरावे हा संदेश त्यांनी नागरिकांना दिला आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी यांनी सांगितले की,चौगुले यांनी नेत्रदान केल्यामुळे हॉस्पिटलला दोन बुब्बुळ प्राप्त झाले. त्याचा उपयोग दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी होईल. शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तमा जोशी यांनीही सहकार्य केले.
त्या म्हणाल्या, जुलै महिना हा अवयवदान जनजागृती महिना म्हणून ओळखला जातो. नेत्रदान, देहदान, त्वचादान या सर्वांसाठी सहा तासांच्या आत ही वेळेची मर्यादा फार महत्त्वाची आहे.
जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज धाम या संस्थेच्या प्रेरणेने देहदान, नेत्रदान, त्वचादान संकल्पना राबवण्यात येत आहे. म्हणूनच आम्ही हे देहदान केले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
याव्यतिरिक्त संस्थानच्या महाराष्ट्रात रुग्णवाहिका असून त्या दहा नॅशनल हायवे वर कार्यरत आहेत त्या मार्फत आतापर्यंत जवळपास २७ हजार लोकांचे प्राण वाचवले आहेत.
यावेळी नातेवाईक आप्पासो केशव चौगुले, संस्थानचे जिल्हा निरीक्षक विलास लांडे, जिल्हाध्यक्ष संजय थोरात, फुलाताई पाटील, पांडुरंग मोरे, अशोक पवार व सहकारी उपस्थित होते.