गंगादास पटेल यांचे मृत्यूपश्चात भारती हॉस्पिटलमध्ये देहदान
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर येथील गंगादास पटेल (वय - ८२) यांचे मृत्यूपश्चात नातेवाईकांनी देहदान केले.
इस्लामपूर येथील पटेल (पाटीदार) परिवारातील पहिले देहदान आहे. किरीट पटेल, पुरुषोत्तम पटेल, भरत पटेल, तुलसीदास पटेल, आणि पटेल परिवाराचे प्रमुख श्यामजीभाई पटेल यांनी स्व. गंगादास पटेल यांच्या मृत्यूपश्चात देहदान करण्याचा निर्णय घेतला. स्व. गंगादास पटेल यांनी इस्लामपूर येथे मे. जलाराम ट्रेडर्सची स्थापना काही वर्षापूर्वी केली होती.
देहदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. अवयवदानाबद्दल काहीही गैरसमज बाळगू नये. आपण जिवंत असेपर्यंत मदत करतोच परंतू मृत्यूपश्चातसुद्धा आपण मदतीचा हात देवू शकतो.
- डॉ.नितीन मुदीराज (अधिष्ठाता - भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली)
त्यांचा देह मरणोत्तर अमर व्हावा या उद्देशाने पटेल परिवाराने नेत्रदान, त्वचादान, देहदान करून समाजामध्ये एक आदर्श योगदान दिल्याची भावना उपस्थित जनसमुदायाने व्यक्त केली.
टेके हॉस्पिटल सांगलीत नेत्रदान, रोटरी स्किन बँकेत त्वचा दान केले आणि भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात आले. त्यांच्या या देहदानाने भविष्यकालीन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी अमूल्य देणगी प्राप्त झाली आहे. या महान कार्याबद्दल संस्था व शरीररचनाशास्त्र विभागातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
इस्लामपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, सुनील मलगुंडे, इंजिनिअर महेश मोरे, डॉ. अतुल मोरे तसेच अवयव दान चळवळीत सहभागी असणार्या डॉ. हेमा चौधरी, डॉ. शितल पाटील, डॉ. दिलीप पटवर्धन, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. उत्तमा जोशी, डॉ. मनिषा पाटील व अन्य सहकारी यांचे सहकार्य लाभले.
अवयव दान जनजागृती करणार्या सामाजिक संस्थेतील जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूरचे अध्यक्ष संपतराव कोकाटे, गजानन परब, अभय शहा, नितीन पारेख, दत्ताजीराव माने, ईश्वरभाई पटेल, किरीट पटेल, प्रविण फल्ले हे उपस्थित होते.