अंध लोकांना दृष्टी मिळण्याचा संकल्प करू - डॉ. विक्रमसिंह कदम
भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
मरणोत्तर नेत्रदान केल्याने कुणाच्या तरी डोळ्यात आपली व्यक्ती पाहू शकतो. त्यामुळे अंध लोकांना दृष्टी मिळण्याचा संकल्प आपण सर्वजण करूया असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले.
येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेत्रदान पंधरवडा या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नेत्ररोग विभागामार्फत याचे आयोजन केले होते. पोस्टर प्रदर्शनही भरविण्यात आले होते.नेत्र शल्यचिकित्सक डॉ.गायत्री खोत, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, अजित लिमये, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा गायकवाड, नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. राजेश गोटेकर उपस्थित होते.
डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, भारती हॉस्पिटलने समाजात चांगला संदेश जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वांनी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला पाहिजे. मरणोत्तर नेत्रदान केल्याने अंधांना दृष्टी प्राप्त होते. हीच खरी समाधानाची बाब आहे. अवयवदानाच्या निमित्ताने सांगली पॅटर्न चळवळ उभी करण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. त्यालाही यश येत असल्याचे त्यांनी सांगितले.नेत्रदान केलेल्या नातेवाईकांचे आभार मानले.
नातेवाईकांनीही भावनिक होत मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्व डॉक्टर आणि रुग्णालयाचे कौतुक केले.मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. राजेश गोटेकर म्हणाले, नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी लोकांनी नेत्रदान करण्याचे आवाहन केले.
डॉ.अजित जोशी म्हणाले,ऋणातून उतराई होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.अंध लोकांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं काम आपण केले आहे. सर्वांनी यासाठी पुढाकार घ्यावा.डॉ.प्रांजली केसकर यांनी दृष्टीदानाविषयी माहिती दिली.
सूत्रसंचालन डॉ. विराज पाटील यांनी केले. आभार डॉ. शलाका क्षीरसागर यांनी मानले. यावेळी डॉ.हणमंत मंडलिक, डॉ. प्रविण हंकारे, डॉ. इंद्रजित शिंदे, डॉ. सुमित डोंगरे व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.