भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात जर्मनीमधील नर्सेससाठी रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली येथे प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या वतीने “जर्मनीमधील नर्सेससाठी रोजगाराच्या संधी आणि जर्मन भाषा ओरिएंटेशन” या विषयावर मार्गदर्शनपर व प्रेरणादायी सत्र उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सुभानंद शिंदे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी त्यांचे स्वागत केले. सुभानंद शिंदे यांनी जर्मनीमधील नर्सिंग क्षेत्रातील वाढती मागणी, आवश्यक पात्रता, कागदपत्रांची पूर्तता, व्हिसा प्रक्रिया तसेच परदेशात नोकरी मिळविण्याच्या टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जर्मन भाषा शिकण्याचे महत्त्व, विविध भाषा स्तर (A1 ते B2) आणि जर्मनीतील कार्यसंस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली.
हे सत्र अत्यंत संवादात्मक, माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरले. चतुर्थ वर्ष बी.एससी. नर्सिंग व द्वितीय वर्ष पी.बी.बी.एससी नर्सिंग विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर करिअर घडविण्याची उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
महाविद्यालयाचे व्यवस्थापन व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांना अशा संधींचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा देण्याचे आवाहन केले.
.jpeg)