नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृतीसाठी भारती विद्यापीठातर्फे सांगलीत भव्य पदयात्रा संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), कॉलेज ऑफ नर्सिंग आणि भारती हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोसायटी ऑफ मिडवाईव्ह्ज, महाराष्ट्र विभाग, पुणे यांच्या अंतर्गत रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी नैसर्गिक प्रसूतीबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व, त्याचे माता व नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच अनावश्यक सिझेरियन प्रसूती टाळण्याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता. यावेळी गर्भवती मातांनी नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देण्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नैसर्गिक प्रसूतीमुळे माता व बाळाच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. तसेच योग्य वैद्यकीय सल्ला, नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन यांद्वारे सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन देता येते असा संदेश देण्यात आला.
या उपक्रमासाठी नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे, नर्सिंग अधीक्षक डॉ. सरस्वती हेरवाडे, नर्सिंग प्राध्यापिका डॉ. विजया कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.या जनजागृती पदयात्रेचे मुख्य आयोजन कु. स्वीटी घाटगे (नर्स एज्युकेटर), सहप्राध्यापिका सौ. अर्चना धनवडे, सौ. सिंधू गायकवाड व सौ तेजस्विनी चौगुले यांनी केले.
या जनजागृती पदयात्रेला सुमारे २२५ सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनी, नर्सिंग कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून नैसर्गिक व सुरक्षित प्रसूतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यास मोलाचे योगदान दिले.
मातृत्वाचा सन्मान, सुरक्षित प्रसूतीचा अधिकार आणि निरोगी बालकांचे भविष्य या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
