भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात नवजात शिशु काळजी विषयक परिसंवाद संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आवश्यक नवजात शिशु काळजी विषयक परिसंवाद व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.सोसायटी ऑफ मिडवाइफ (महाराष्ट्र चॅप्टर) आणि भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आवश्यक नवजात शिशु काळजी विषयावर परिसंवाद व कौशल्य प्रशिक्षण ०५ मार्च २०२६ रोजी घेण्यात आले.
या कार्यक्रमाला हिमालया वेलनेस कंपनीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा उद्देश नर्सिंग विद्यार्थी, प्रसूती परिचारिका (मिडवाइफ) आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांचे नवजात शिशु काळजीबाबत ज्ञान व कौशल्य वाढविणे हा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी नर्सिंग अधीक्षक ससून जनरल हॉस्पिटल पुणेचे माजी नर्सिंग अधीक्षक व सोसायटी ऑफ मिडवाइफ्स इंडियाचे अध्यक्ष मंगला जोशी (महाराष्ट्र चॅप्टर) यांच्याहस्ते संपन्न झाले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माजी प्राचार्या डॉ. निलिमा भोरे यांनीही मार्गदर्शन केले. स्वागत नर्सिंगचे प्राचार्य डॉ.सुरेशकुमार रे यांनी केले.
वैज्ञानिक सत्रामध्ये डॉ.विजया कुंभार यांनी नवजात शिशु काळजीचे महत्त्व आणि आव्हाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नवजात शिशुंच्या आरोग्य संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत काळजीविषयी माहिती दिली. स्कूल ऑफ नर्सिंग डी वाय पाटील पिंपरी, पुणेच्या माजी प्राचार्य डॉ. सुजाता सावंत यांनी नवजात शिशु काळजी देण्यात मिडवाइफची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. सोसायटी ऑफ मिडवाइफ्स इंडियाचे सचिव (महाराष्ट्र चॅप्टर) विषयी माहिती डॉ. संगीता भुजबळ यांनी सादर केली. सिम्युलेशन लॅब सांगली विभागात विविध कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आयोजित करण्यात आली. यात नवजात शिशु पुनरुत्थान, सामान्य प्रसूतीची यंत्रणा, एपिसिओटॉमी आणि सिवनी, स्तनाची स्व-तपासणी आणि तांबी घालणे. या कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
हा कार्यक्रम नर्सिंग व्यावसायिकांचे कौशल्य व ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. नवजात शिशु आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास मदत करेल असा विश्वास प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी व्यक्त केला.
