भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात नोंदणीकृत परिचारिकांसाठी सतत व्यावसायिक विकास सीपीडी कार्यक्रम. ३०० परिचारिकांचा सहभाग
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय सांगली यांनी दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदणीकृत परिचारिकांसाठी सतत व्यावसायिक विकास सीपीडी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. हा सीपीडी कार्यक्रम नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडला. या सीपीडी कार्यक्रमास एकूण ३०० परिचारिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचा विषय 'बालरोग परिचर्या व्यवहारातील उदयोन्मुख नवकल्पना व प्रगत सुधारणा' असा होता. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांनी १० क्रेडिट पॉइंट्सची मान्यता दिली. प्रमुख पाहुणे म्हणून भारती हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कुंभार उपस्थित होते. सीपीडी निरीक्षक म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र टाकळी, ता. मिरज येथील प्रभुदास सुधाकर लाड होते. बालरोग परिचर्या विभागप्रमुख डॉ. अपर्णा काळे, भारती हॉस्पिटलच्या एचचार मॅनेजर श्वेता कुलकर्णी, नर्सिंग अधीक्षक सरस्वती हेरवाडकर व वरदा सावर्डेकर उपस्थित होत्या. याप्रसंगी सीपीडी समन्वयक व प्रा. धनराज बाबू यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचा मुख्य हेतू बालरोग परिचर्या सेवेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत चिकित्सीय पद्धती व पुराव्यावर आधारित उपाययोजना यांचा समावेश करून बालआरोग्य सेवेमधील गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता वाढवणे हा होता. शैक्षणिक सत्रांचे मार्गदर्शन डॉ. अपर्णा काळे, प्रा. शैला मॅथ्यू, प्रा. अर्चना धनवडे, प्रा. शिल्पा सत्राळकर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर सौ. मनीषा कुलकर्णी कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली यांनी केले. सर्व वक्त्यांनी अनुभवसंपन्न व उपयुक्त मार्गदर्शन करून सहभागी परिचारिकांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत केले.
