BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटल तर्फे मोफत सर्व रोग तपासणी व निदान शिबीर

 

भारती विद्यापीठाच्या सांगली येथील भारती वैद्यकीय महाविद्यालय व भारती रुग्णालय यांच्या वतीने पलूस तालुक्यात सोमवार ता. २१ फेब्रुवारी पासून  मोफत सर्व रोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मानद संचालक डॉ. एच.एम. कदम यांनी दिली.


स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या  व सद्या  राज्याचे सहकार व  कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सांगली  येथील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने नेहमीच गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते.

सोमवार ता.२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वसगडे येथील मराठी शाळेत, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व मंगळवारी ता.२२ रोजी पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, बुधवार ता. २३ रोजी अंकलखोप आरोग्य उपकेंद्र, ता. २४ रोजी कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व ता.२५ रोजी रामानंदनगर येथील आरोग्य उपकेंद्र येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शिबीर संपन्न होणार आहे.

या  मोफत आरोग्य शिबिरात वैद्यक शास्त्र, स्त्री रोग, बालरोग, अस्थीरोग, कान, नाक, घसा, नेत्र चिकित्सा व इतर रोग तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाचे तज्ञ डॉक्टर यावेळी तपासणी करणार आहेत. गरजू रुग्णांची भारती हाँस्पिटल , सांगली येथे सवलतीच्या दरात विशेष तपासणी, शस्त्रक्रिया व औषधे देण्यात येणार आहेत.  गरजू रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व भारती विद्यापीठ रग्णालय, सांगली यांचे वतीने  डॉ. एच. एम. कदम यांनी केले आहे.