भारती हॉस्पिटलमधील ३ डॉक्टरांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार - तामिळनाडूत सन्मान
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे डॉ.अमित कोले, डॉ.शशिकांत दोरकर, डॉ. शिवानी पांचाल यांना कान, नाक, घसा या विभागात एक नवीन संशोधन केल्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने परदेशातील तज्ञ डॉक्टरांकडून सन्मानित करण्यात आले. भारतातून ३६ जणांची यामध्ये निवड केली होती. यामध्ये भारती हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांचा समावेश आहे.
ISSN, वर्ल्ड रिसर्च कौन्सिल आणि ऑक्सफर्ड रिसर्च सोसायटी या संस्थेकडून ISSN इंटरनॅशनल रिसर्च अवॉर्ड्स आणि काँग्रेस या परिषदेत २०२४ चा इंटरनॅशनल बेस्ट रिसर्चर अवॉर्ड देण्यात आला.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांच्यासह सर्व डॉक्टरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्रिची (तामिळनाडू) येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
विभागप्रमुख डॉ.सचिन निलाखे, डॉ.अशोक पुरोहित यांचे सहकार्य लाभले. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक विषयात वर्षातून एकदाच दिला जातो. तीन डॉक्टरांनी मिळून एक संशोधन केले होते. यासाठी त्यांना ५ वर्षाचा कालावधी लागला. त्याची दखल घेऊन ऑक्सफर्ड रिसर्च सोसायटीने हा पुरस्कार दिला.