भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक दृष्टीदान दिवस साजरा l नेत्रदान करण्याचे केले आवाहन
भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक दृष्टीदान दिवस व डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिवस साजरा करण्यात आला. नेत्र विभागाच्यावतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते.
उदघाट्न भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांच्याहस्ते करण्यात आले. यातून नेत्रदान करणे किती गरजेचे आहे ते सांगून त्याची जागृती विद्यार्थ्यांनी केली. यावेळी डीन डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, विभागप्रमुख डॉ.राजेश गोटेकर उपस्थित होते.
डॉ.राजेश गोटेकर म्हणाले, नेत्रदान केल्याने चार व्यक्तींना त्याचा लाभ होऊ शकतो. नागरिकांत जागृती आहेच परंतू ही नेत्रदानाची चळवळ गतिमान कशी होईल यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ.अजित जोशी म्हणाले, लहानांपासून थोरांपर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो. मृत्यूनंतर नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे ६ तासात मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बँकेत जमा होतील अशी कार्यवाही करावी. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १० जून हा दिवस डॉ.भालचंद्र स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
डॉ.साक्षी पाटील यांनी बुबुळाच्या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. नेत्रबुबुळ रोपणाविषयी सांगितले. नेत्रदानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केले.
कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्रीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदानाविषयी गीत सादर केले. त्यामधून प्रबोधन करण्यात आले. ज्यांनी नेत्रदान केले आहे त्यांच्या नातेवाईकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेत्रदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित नातेवाईकांपैकी एका नातेवाईकाने भारती हॉस्पिटलमध्ये केलेले नेत्रदान यशस्वी होत असल्याची भावना व्यक्त करून डॉक्टरांचे आभार मानले. सर्वांनी नेत्रदान करण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन मानसी अजगेकर तर आभार डॉ.शलाका क्षीरसागर यांनी मानले.
डॉ.शिल्पा गायकवाड, अजित लिमये यांच्यासह सर्व डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.