भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पहिली सांध्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत (एम.जे.पी.जे.वाय) पहिली टोटल हिप रिप्लेसमेंट (THR) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुजय महाडिक यांनी केली.
ते म्हणाले, भारती हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया होतातच परंतू सांध्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही प्रथमच योजनेत बसली आहे. ६० वर्षीय पुरूष रुग्णाला दीर्घकाळापासून नितंब सांध्याच्या तीव्र संधिवातामुळे चालण्यात अत्यंत अडचण येत होती. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली. रुग्ण आता उत्तम प्रकारे बरा होत आहे.
या योजनेमुळे आम्हाला अशा रुग्णांना अत्याधुनिक सांध्याच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देता येतात. ज्यांना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही अशांसाठी ही योजना उत्तम आहे. सर्वांसाठी समतोल व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या आमच्या ध्येयाशी ही योजना सुसंगत आहे. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांद्वारे प्रगत अस्थिरोग उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले की,महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत तृतीयस्तरीय आरोग्यसेवा प्रदान करते. अलीकडेच या योजनेंतर्गत प्रगत अस्थिरोग आणि ट्रॉमा शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे, जसे की टोटल हिप रिप्लेसमेंट (THR), टोटल नी रिप्लेसमेंट (TKR), फ्रॅक्चर फिक्सेशन विथ इम्प्लांट्स, स्पायनल इन्स्ट्रुमेंटेशन आणि विकृती सुधारणा शस्त्रक्रिया, स्पोर्ट्स आणि लिगामेंट इजा यांसाठी आर्थ्रोस्कोपिक प्रक्रिया.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे म्हणाल्या, या शस्त्रक्रियेचे यश भारती हॉस्पिटलसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या योजनेंतर्गत अधिकाधिक गुंतागुंतीच्या अस्थिरोग व ट्रॉमा शस्त्रक्रिया करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे आणखी अनेक रुग्णांना या जीवन बदलणाऱ्या उपचारांचा लाभ मिळू शकेल.अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज ते म्हणाले,ही कामगिरी आमच्या रुग्णालयात प्रथमच झाली. शैक्षणिक उत्कृष्टतेसह दयाळू सेवाभावाचे हे प्रतिक आहे. महात्मा फुले योजनेंतर्गत अत्याधुनिक अस्थिरोग उपचार समाजातील सर्वात गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्हाला अभिमान आहे.
उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा गायकवाड यांच्यासह सर्व डॉक्टरांनी कौतुक केले.
या यशासह भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सांगली हे अस्थिरोग क्षेत्रातील प्रादेशिक उत्कृष्टता केंद्र म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. भारती विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार डॉ. विश्वजीत कदम, भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था एम.जे.पी.जे.वाय. अंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रियांचा विस्तार करण्याचे नियोजन करत आहे. ज्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवा २४ तास सर्वांसाठी सुलभ आणि उपलब्ध राहील.
डॉ.सतीश मेहता, डॉ. अनुराज राक्षसकर, डॉ. शैलेश शेवाळे, डॉ. चंद्रप्रकाश सिंग, डॉ. करण हिंगणकर, डॉ. प्रज्वल सरोदे, डॉ. दीप पटेल, डॉ. तरण सिंग, डॉ. विजया देवकुळे यांचे सहकार्य लाभले.
