BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये फिझिओथेरपीच्या भविष्यावर मंथन | फिझीनोव्हा २.० राष्ट्रीय परिषद २०२६ संपन्न


भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये फिझिओथेरपीच्या भविष्यावर मंथन - फिझीनोव्हा २.०  राष्ट्रीय परिषद  २०२६ संपन्न


सुमारे ५०० जणांचा सहभाग. 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ फिजिओथेरपी यांच्यावतीने १० जानेवारी रोजी आयोजित केलेल्या फिझीनोव्हा २.० राष्ट्रीय  परिषद २०२६ या दुसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय फिजिओथेरपी परिषदेस चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून सुमारे ५०० जणांनी सहभाग नोंदवला. परिषदेत विद्यार्थी, संशोधक तसेच फिजिओथेरपी व्यावसायिक यांचा उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला. या

तज्ञ, अभ्यासक आणि उत्साही लोकांनी  एकत्र येऊन फिजिओथेरपी प्रॅक्टिसचे भविष्य, विकास व सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा केली. स्वागत भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्नेहा कटके यांनी केले. उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मृतीस अभिवादन करून केले. इंडिअन फिजिओथेरपीस्ट असोसिएशन दिल्लीचे उपाध्यक्ष डॉ.सुरेश बाबू रेड्डी, 

भारती विद्यापीठ मेडिकल सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, जी.एम.सी.मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डॉ.सुदीप काळे, शैक्षणिक संचालक डॉ. आर. बी. कुलकर्णी, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदिराज, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी पुणे प्राचार्या डॉ. स्वाती भिसे उपस्थित होत्या.

विविध विषयांमधील तज्ञांना एकत्रित करून कार्यक्रमातील प्रमुख सत्रांमध्ये न्यूरो फिजिओथेरपीतील नव्या संकल्पना, बालकांमधील मोटर-कॉग्निटिव्ह इंटिग्रेशन, सर्व्हिको-जेनिक डोकेदुखीचे आधुनिक मूल्यांकन व उपचार, कर्करोग उपचारात पुनर्वसनाचे महत्त्व तसेच वृद्धांमध्ये बायो-सायको-सोशल मॉडेलद्वारे पुनर्वसन या विषयांचा समावेश होता. यासोबतच क्रीडा दुखापती प्रतिबंध व आधुनिक अ‍ॅथलीटसाठी स्मार्ट स्ट्रॅटेजीज यावरही विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. या शैक्षणिक सत्रांमध्ये डॉ. राधा भट्टाड, डॉ. संजय परमार, डॉ. रिंकल मालाणी, डॉ. रेणू पट्टणशेट्टी, डॉ. स्नेहल धर्मायत व डॉ. वैभव महाजन या नामवंत तज्ञांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी फिजिओथेरपी संशोधनातील उणिवा, धोरण, मनुष्यबळ, नोंदणी व्यवस्था व क्षमता, वृद्धी या विषयांवर आधारित पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली. सदर चर्चेमध्ये डॉ. श्रीकांत संत, डॉ. सुदीप काळे, डॉ. गजानन भालेराव ,डॉ. अविजान सिन्हा व डॉ. जी. वरदराजूलु यांचा सहभाग होता . तसेच या परिषदेत स्थानिक व राष्ट्रीय सहभागींनी सहभाग घेऊन  शोधनिबंध, पोस्टर्स सादर केले.  या परिषदेत डॉ.श्याम गणवीर व डॉ. जी. वरदराजूलु यांना लीडरशिप व्हिजनरी एक्झलन्स अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिषदेचे संयोजक डॉ.प्रतिक फणसोपकर यांच्यासह डॉ.प्रसन्नजीत निकम, कार्यक्रम समन्वयक डॉ. मनाल अंतीकात व डॉ.सचिन शेट्टी होते. सूत्रसंचालन डॉ. अक्षय चौगुले व डॉ.ऐश्वर्या बुलबुले यांनी केले.

हि परिषद एक चांगले व्यासपीठ ठरली. या परिषदेने  शैक्षणिकदृष्टय़ा सहकार्याची पायाभरणी करून फिजिओथेरपी शिक्षणाचा जागतिक स्तरावर प्रभाव पाडून चालना व प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.