BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंगमध्ये ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न


भारती विद्यापीठ नर्सिंगमध्ये ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग यांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांच्या सहकार्याने नर्सिंग कर्मचाऱ्यांमधील ताणतणाव व बर्नआऊट व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजनांवर आधारित सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रम आयोजित केला. एकूण ३८० जणांनी यात सहभाग घेतला. स्वागत नर्सिंग प्राचार्य सुरेश कुमार रे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कॉलेज ऑफ नर्सिंग येथे करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातील वाढत्या मानसिक व भावनिक ताणावर मात करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व उपाययोजना विकसित करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. प्रथमतः नाव नोंदणी झाली. त्यानंतर उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे CPD विभागाचे अध्यक्ष व कृष्णा विश्व विद्यापीठ कराडचे उपप्राचार्य डॉ. महादेव शिंदे उपस्थित होते. त्यांनी नर्सिंग व्यावसायिकांसाठी सतत शिक्षण व मानसिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नर्सिंग प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांनी नर्सिंग कर्मचाऱ्यांवरील वाढत्या कामाच्या ताणामुळे निर्माण होणाऱ्या बर्नआऊट समस्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. नारायण घोरपडे, डॉ. बाहुबली गेद्दुगोळ, डॉ. विजया कुंभार, डॉ. अपर्णा काळे, डॉ. धनराज बाबू यांनी नर्सिंग कर्मचाऱ्यांना व्यावसायिक व वैयक्तिक जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य जपणे आणि कार्यक्षमता वाढविण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
आभार डॉ. बसवंत धुडूम यांनी मानले. सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 

 या कार्यक्रमामुळे नर्सिंग कर्मचाऱ्यांमध्ये ताण व्यवस्थापन, भावनिक स्थैर्य, काम-जीवन संतुलन व सहाय्य व्यवस्थेचा प्रभावी वापर याबाबत जागरूकता वाढली आहे. व्यावसायिक कार्यक्षमतेसह वैयक्तिक आरोग्यातही सुधारणा होण्यास मदत होईल.