भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. मनाल अंथीकट यांचे आंतरराष्ट्रीय यश
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या प्रा.डॉ. मनाल अंथीकट यांनी दक्षिण आफ्रिकेत १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन (The Ultimate Human Race) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वेगवान महिला धावपटूचा मान त्यांनी पटकावला.
सुमारे २२ हजार स्पर्धकांच्या सहभागासह ८५.७७७ कि.मी. अंतर आणि १७५० मीटर उंचीचा चढाव असलेल्या या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत त्यांनी ९ तास ५४ मिनिटे १९ सेकंद अशी प्रभावी वेळ नोंदवली.
हे यश केवळ वैयक्तिक नसून भारतासाठी आणि संस्थेसाठीही एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय गौरव आहे. शैक्षणिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी केलेले हे यशस्वी प्रदर्शन समर्पण, चिकाटी आणि उत्कृष्टतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी परिवाराला त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीचा अत्यंत अभिमान आहे. भारती विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार डॉ. विश्वजीत कदम, भारती हॉस्पिटल पूणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्राचार्या डॉ. स्नेहा कटके व सहकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.