BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा


भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा

भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ३ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह विविध शैक्षणिक, प्रात्यक्षिक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

या  कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश कुमार रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

 यावर्षीची संकल्पना 'शाश्वत जीवनाची सुरुवात स्तनपानातून – भावी पिढ्यांसाठी प्रभावी स्तनपान पद्धतींना बळकटी देऊया' अशी होती.

या सप्ताहाचे आयोजन प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या, बाल आरोग्य परिचर्या आणि सामाजिक आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा, रील स्पर्धा, तज्ज्ञ व्याख्याने, सुसंवाद, चर्चा तसेच स्तनपान तंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

'कांगारू पितृ संगोपन: नवजात बाळाच्या काळजीत वडिलांचा सहभाग' या विषयावर जामवाडी आरोग्य केंद्र येथे विद्यार्थ्यांनी “नवजात शिशूच्या संगोपनात व मातेला स्तनपानासाठी आवश्यक सहकार्य देण्यात वडिलांची भूमिका” या विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच स्तनपान विरुद्ध फॉर्म्युला फीडिंग: प्रत्येक मातेसाठी योग्य पर्यायाची निवड या विषयावर भारती हॉस्पिटलच्या नवजात शिशु विभागाच्या सहकार्याने चर्चासत्र घेण्यात आले.

'स्तनपान यशस्वी करण्यासाठी परिचारिकांची महत्त्वपूर्ण भूमिका' या विषयावर नवजात विभागाचे शिशू तज्ज्ञ, भारती हॉस्पिटल, सांगली यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानास तृतीय वर्ष बी.एस्सी. नर्सिंगचे ८५ विद्यार्थी उपस्थित होते.

सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी भारती हॉस्पिटलच्या प्रसुतीकक्षामध्ये मातांना  स्तनपानाच्या योग्य स्थिती, स्तनपान करताना बाळाची योग्य पकड, अकाली जन्मलेल्या बाळाचे स्तनपान, सिझेरियननंतरचे स्तनपान आणि मातेला आरामदायी स्थिती याबाबत चतुर्थ  वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक दाखविले.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्तनपानाविषयीचे ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि मातांना योग्य समुपदेशन देण्याची क्षमता वाढण्यास मदत झाली. संपूर्ण सप्ताह शैक्षणिक, प्रात्यक्षिक आणि सामाजिक जनजागृतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरला. तसेच सहभागी लाभार्थी १८५ विद्यार्थी यांना प्रमाणपत्र व सहभागी १०० मातांना पौष्टिक आहार देण्यात आला.