BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

परिचारिका ही समाजाच्या आरोग्याचा मजबूत आधार - विक्रम सावंत

परिचारिका ही समाजाच्या आरोग्याचा मजबूत आधार - विक्रम सावंत 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

परिचारिकांची सेवा ही केवळ उपचार नसून ती समाजाच्या आरोग्याचा मजबूत आधार असल्याचे मत जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्त केले.

 येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 



फ्लोरेन्स नाईंटिगेल यांचा जन्मदिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आमच्या परिचारिका, आमचे भविष्य, परिचारिकेंची काळजी घेणे अर्थव्यवस्था मजबूत करते ही यावर्षीची थीम होती.

शासकीय मेडिकल कॉलेज मिरजचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव यांच्यासह नर्सिंग प्राचार्य डॉ.सुरेशकुमार रे, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, डॉ.सुमन पवार प्रमुख उपस्थित होते.

विक्रम सावंत म्हणाले, भारती हॉस्पिटलमधील परिचारिकांचे काम उत्तम आहे. ते चांगल्या पद्धतीने रुग्ण सेवा करतात, आस्थेवाईकपणे चौकशी करतात. रुग्णांवर अविरत २४ तास लक्ष ठेवून असतात. यामुळेच सर्व रुग्णालयात परिचारिकेची भूमिका महत्त्वाची आहे. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी या भारती विद्यापीठाचे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालवले आहे. तोच वारसा आमदार डॉ. विश्वजीत कदम चालवत आहेत. आपण सर्वजण त्यांचे पाईक होऊया. ते काम नेटाने पुढे नेऊया.

 दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नर्सिंगच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

भारत सरकारच्या राष्ट्रपती डॉ.प्रणव मुखर्जी यांच्याकडून २०१५ चा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त परिचारिका श्रीमती अमिना नदाफ तसेच

नर्सिंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमधील उत्कृष्टतेबद्दल डॉ. नारायण घोरपडे यांचाही सन्मान करण्यात आला. 

डॉ.सारा धनवडे, डॉ.प्रकाश गुरव, डॉ. अजित जोशी, डॉ. सुरेशकुमार रे, अमिना नदाफ यांनी मार्गदर्शन केले.

डेंटलचे प्राचार्य डॉ.शरद कामत, स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ.स्नेहा कटके, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मुदीराज, प्रा. अजित लिमये, वरदा सावर्डेकर यांच्यासह सर्व डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत प्राचार्य डॉ.सुरेशकुमार रे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.शिल्पा सत्राळकर, आभार प्रा. स्वाती कुरणे यांनी मानले.