BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न



भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली येथे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाच्या (IQAC) पुढाकाराने “शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षण – चिंतन, पुनरावलोकन आणि प्रगती : एकत्रितपणे गुणवत्तेची उभारणी” या विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

नर्सिंग प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज होते.भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. उत्तमा जोशी व शरीरक्रियाशास्त्र प्रा. डॉ. मीना पारेख यांनी मार्गदर्शक सत्रे घेतली.

या प्राध्यापक विकास कार्यक्रमामध्ये शैक्षणिक व अध्यापन लेखापरीक्षणाची मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रिया, पाठ नियोजनाचे पुनरावलोकन, प्रात्यक्षिक अध्यापन लेखापरीक्षण उपक्रम तसेच गटचर्चा आणि प्रकरण अभ्यासांच्या माध्यमातून गुणवत्तावृद्धी या विषयांवर विशेष भर देण्यात आला. सर्व सत्रे अत्यंत संवादात्मक, माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरली. या सत्रांमधून चिंतनशील अध्यापन, पद्धतशीर पुनरावलोकन, योग्य दस्तऐवजीकरण आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित वास्तवातील अनुभव, वास्तवातील बदल या संकल्पनेवर मनोरुग्ण परिचर्या विभागप्रमुख डॉ. बाहुबली गेद्दूगोळ यांनी विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य प्रोत्साहित करणे आणि ते जपणे यामध्ये परिचर्या शिक्षक व प्राध्यापकांची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक अनुभव मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी सांगितले.

सूत्रसंचालन क्लिनिकल इन्स्ट्रक्टर निखिल जाधव यांनी केले.कार्यक्रमाबाबतचा अभिप्राय श्रीमती आशा अमोघसिद्ध नायकवाडी, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, आणि डॉ. धनराज बाबू यांनी व्यक्त केला.कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.