भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तीन दिवस जनजागृती कार्यक्रम
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली येथे १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. हा तीन दिवस जनजागृती कार्यक्रम मानसिक आरोग्य (मानसोपचार) परिचर्या विभागातर्फे संपन्न झाला.कार्यक्रमाला भारती हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.
या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना “Lived Experiences Heard: Real Voices, Real Change” अशी होती. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव ऐकून घेणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांना योग्य आधार मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
१३ ऑक्टोबर रोजी समुपदेशन कक्षाचे उद्घाटन आणि मार्गदर्शनपर चर्चासत्र संपन्न झाले.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉ. चंद्रशेखर हळींगळे, संचालक व वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, निर्मल हॉस्पिटल, व्यसनमुक्ति आणि पुनर्वसन केंद्र, मिरज, यांच्याहस्ते मानसिक आरोग्य विभागाच्या अधीन सामावलेले समुपदेशन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर डॉ. हळींगळे यांनी विद्यार्थ्यांसाठी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शनपर चर्चासत्र घेतले. या कार्यक्रमात बी.एस्सी. नर्सिंग, पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग आणि एम.एस्सी. नर्सिंगच्या एकून ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्वतःचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्या बद्दलचे सुत्र, भावना, विचार आणि वर्तणुक यांच्यातील समतोल, मानसिक आरोग्य सेवांबाबत संवेदनशील दृष्टिकोन विकसित करणे यांचे महत्त्व या चर्चासत्रातून अधोरेखित करण्यात आले.
१४ ऑक्टोबर रोजी भारती हॉस्पिटल सांगलीच्या बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर एम.एस्सी. नर्सिंग प्रथम व द्वितीय वर्ष तसेच पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित पोस्टर सादर केले. तृतीय वर्ष बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाला भारती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदिराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, डॉ. नीलम बेहरे, नर्सिंग अधीक्षक डॉ. सरस्वती हेरवाडे, प्रशासकीय अधिकारी अभिजित तोडकर आणि मानव संसाधन विभागाच्या श्रीमती श्वेता कुलकर्णी उपस्थित होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. नीलम बेहरे यांनी कार्यक्रमाच्या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. एम.एस्सी. नर्सिंग प्रथम वर्षाच्या श्रीमती वर्षा साने यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती शेफाली दारूवाला यांनी आभार मानले.
तसेच कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर आणि एम.एस्सी. नर्सिंग प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मानसोपचार विभागातील रुग्णांना फळांचे वाटप केले. या उपक्रमातून रुग्णांप्रती आपुलकी, सहानुभूती आणि मानवी संवेदनशीलता व्यक्त करण्यात आली.
१५ ऑक्टोबर रोजी पथनाट्यातून सार्वजनिक मानसिक आरोग्य जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी तृतीय वर्ष बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी साईश्वरी हॉस्पिटल आणि निर्मल हॉस्पिटल मिरज परिसरात मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले.
या उपक्रमाचे लाभार्थी महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असे मिळून सुमारे २०० जण होते. पथनाट्याच्या माध्यमातून मानसिक आरोग्यविषयक माहिती सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमांत विभागप्रमुख डॉ. बाहुबली गेद्दूगोळ यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

